म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत आहे. आता पुन्हा त्यात बदल करून पूर्वीप्रमाणेच २५० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुंबईतील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना म्हाडाने थकीत घरभाडे दंडासहित भरण्याच्या दिलेल्या नोटिसाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री अमीन पटेल, कालिदास कोळंबकर, योगेश सागर, अबू आजमी,आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सुधारित सेवा शुल्क दर कमी करावा, याबाबत निवेदने प्राप्त झाली होती. सध्या सुधारित सेवा शुल्क दराच्या आकारणीबाबत आणि नोटीस बजावण्याबाबत तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उपकरप्राप्त इमारतीच्या अडचणी लक्षात घेऊन या इमारतीच्या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, तसेच याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.