पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी..

महाराष्ट्र

नागपूर: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करुन हे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेत उपस्थित चर्चेत सहभाग घेताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड राज्यातील महत्वाची शहरं असून तिथल्या वाहतूक, पिण्याचे पाणी, कायदा-सुव्यवस्था, उद्योगपुरक वातावरण आदी प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधीत यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात यावी.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावे. शहरांच्या विकासासाठी विरोधी पक्ष राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीशी सहमती दर्शवत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.