अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

राजकीय

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४७ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्येनंतरही लॅबकडे पाठविण्यात येत असलेला व्हिसेरा रिपोर्ट निरंक येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर शेतकऱ्याच्या मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आधीच घरातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने खचलेल्या शेतकरी कुटुंबियांना सरकारी दरबारी मदतीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे निदर्शनास आले. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी विरोधी पक्षनेते अंबदास दानवे भेट देणार असून त्यांच्या व्यथा जाणून घेतील.

तसेच बीड जिल्ह्यातील गेवराईत कॉफी शॉप मध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पीडित मुलीची व कुटुंबियांची भेट घेणार आहेत.