शिरुर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा रातीस खेळ चाले: कसा तो पहा

शिरूर तालुका

रात्रीच्या वेळेस पेटविला जातोय धोकादायक कचरा

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या गंभीर बनत असून ग्रामपंचायतच्या वतीने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता चक्क सदर कचरा रात्रीच्या सुमारास धोकादायक पद्धतीने पेटविला जात असल्याने तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचा रातीस खेळ चाले असे म्हणण्याची वेळ आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणून ओळखले जात असून या गावात शेळ्या मेंढ्यांसह मोठ्या स्वरुपाचा आठवडे बाजार प्रत्येक सोमवारी भरतो. या बाजारामध्ये अनेक ठिकाणांहून व्यापारी, विक्रेते व ग्राहक येत असतात. महाराष्ट्रात सर्वत्र प्लास्टिक वापरावर बंदी असून देखील बाजारात विक्रेते व ग्राहकांकडून प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे आठवडे बाजाराच्या दुसऱ्या दिवशी बाजार मैदान व परिसरात प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

सदर कचरा ग्रामपंचायतीच्या वतीने गोळा केला जातो. मात्र या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता कचरा वेळ नदीच्या कडेला टाकुन रात्रीच्या सुमारास धोकादायक पद्धतीने पेटवला जातो. यापूर्वीही काही ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये कचऱ्याची समस्या मांडली होती. मात्र यावर ग्रामपंचायत प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेऊन परिस्थिती जैसे थे आहे. सध्या गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साचले असून हा कचरा वेळ नदीच्या कडेला टाकला जात असल्याने नदी प्रदूषण होऊन पिण्याच्या पाण्याचा तसेच पेटविल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्रामपंचायतीने याव योग्य निर्णय घेऊन हा कचरा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे: मच्छिंद्र भुजबळ
तळेगाव ढमढेरे येथील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतकडे जागेची सोय नसल्याने गावात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत वरिष्ठांकडे जागा व निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला असून लवकरच जागा उपलब्ध करत यावर तोडगा काढून कचरा प्रश्न सोडवला जाईल, असे उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांनी सांगितले.

तळेगाव ढमढेरे गावच्या कचरा साठी शासनाकडे पत्रव्यवहार करुन जागेची मागणी केलेली आहे. मात्र अद्याप वरिष्ठांचे काही उत्तर आलेले नसल्याने कचरा प्रश्न सोडवण्यास अडचणी येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.