Crime

जातेगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून सदर शेतकऱ्याची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युगराज हंसराज पवार व महादेव युगराज पवार या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी हनुमंत मोरे यांचा शेतीसह कारखान्याचे ऊस तोड करुन कारखान्याला देण्याचा व्यवसाय आहे. मोरे यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने ते विविध ठिकाणहून कामगार आणत असतात. गवारे यांची त्यांच्या व्यवसायातून युगराज पवार व महादेव पवार यांच्या सोबत ओळख झालेली होती. पवार यांनी मोरे यांना तुम्हाला उसतोड कामगार आणून देतो त्यांना देण्यासाठी उचल द्यावी लागेल असे म्हणून तब्बल 8 लाख रुपये घेतले.

त्यांनतर आज कामगार येतील, उद्या कामगार येतील असे म्हणत कामगार पुरविण्यास टाळाटाळ केली. मात्र काही केल्या पवार यांनी कामगार पुरविले नाही तसेच मोरे यांचे पैसे देण्यात देखील टाळाटाळ करु लागले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हनुमंत सुनील मोरे (वय ३१) रा. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी युगराज हंसराज पवार व महादेव युगराज पवार दोघे रा. रोकडे ता. चाळीसगाव जि. जळगाव या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.