सविंदणे व कान्हूर मेसाई येथील पिण्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार…

शिरूर तालुका

नळ पाणीपुरवठा योजनेस तब्बल २४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर

सविंदने (अरुणकुमार मोटे): जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे या गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल२४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कान्हूर मेसाई व सविंदणे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषापेक्षा जास्त होता. तसेच योजनेची किंमत रु. ५.०० कोटीपेक्षा जास्त असल्यामुळे सदर नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे यांनी संदर्भ क्रमांक ०९ अन्वये शासनाच्या मान्यतेकरीता सादर केला होता. प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे.

तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दि. १० जून २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे येथील ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेच्या रु. २४६१.०५ ला (ढोबळ) इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून दुष्काळी असणाऱ्या कान्हूर मेसाई गावाला पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

कान्हूर मेसाई व सविंदणे येथील वाढती लोकसंख्या व गावठाणाच्या विस्तारामुळे पूर्वीच्या योजनांचे पाणी अपुरे पडत होते. त्यामुळे या दोन्ही गावांना कायमच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्या प्रश्न सुटण्यासाठी या गावांची स्वतंत्र योजना असावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. कान्हूरच्या सरपंच चंद्रभागा विठ्ठल खर्डे व सविंदण्याच्या सरपंच सोनाली अमोल खैरे यांनी याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला होता.

या प्रकल्पात पाणी साठवण, शुद्धीकरण प्रकल्प यांचा या योजनेत समावेश असून, योजनेच्या पूर्णत्वानंतर या दोन्ही गावांतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. मुख्य गावठाणांबरोबरच भविष्यात या गावांच्या वाड्यावस्तांवरही शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून ही सुधारित महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना होत असल्याची माहिती आंबेगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर व उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी दिली.. ही योजना मंजूर होऊन कोटयावधी रुपयांचा निधी ऊपलब्ध करून दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व प्रशासकीय आधिकाऱ्यांचे दोनही गावच्या ग्रामस्थांनी आभार मानले आहे.