पिंपरखेड च्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली स्मशानभूमीची सुधारणा

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्मशानभूमीची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचे रुप पालटून गेले आहे. लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी सुमारे १ लक्ष ६ हजार तर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी ७४ हजार रुपये एवढा स्वनिधी उभा केला असल्याची माहिती माजी उपसरपंच रामदास ढोमे यांनी दिली.

मागील 2 ते 3 महिन्यांत मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस व सतत होणारे अंत्यविधी यामुळे स्मशानभूमी परिसराची मोठी दुरवस्था झाली होती. याआधी ही सुधारणा करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांचे माध्यमातून रस्त्यासाठी व सभामंडपासाठी प्रत्येकी १० लक्ष, तर सोसायटीचे माजी संचालक स्व. दशरथ वरे यांचे स्मरणार्थ कुटुंबियांकडून २ लक्ष ५० हजार एवढा निधी मिळाला असल्याने सुसज्य सभामंडप तयार झाला असल्याचे दिसून येत आहे.

तसेच सध्या स्मशानभूमीची झालेली दुरवस्था पाहून माजी उपसरपंच रामदास दरेकर व कुटुंबियांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपये निधी दिला आहे. मागील पाच वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुमारे १ लक्ष ८३ हजार तर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव स्व.किसन बोंबे यांचे स्मरणार्थ पेव्हिंग ब्लॉक व सुधारणा करण्यासाठी काही निधी जमा झाला होता.

यावेळी ग्रामस्थांचा गावच्या विकाससाठी असलेला सहभाग पाहता गावातील तरुणांनी स्मशानभूमी परिसराचे राहिलेले उर्वरित काम करण्याचा निर्धार करून हे काम हातात घेतल्याने स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुंदर बनला असून गावच्या विकासासाठी एकत्रितपणे मदत करत असल्याचा प्रत्यय यावेळी आला.

प्रसंगी हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी उपसरपंच विकास वरे, माजी उपसरपंच नरेश ढोमे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, नवनाथ पोखरकर, सोसायटीचे संचालक अशोक ढोमे, सतिश बोंबे, नरेंद्र बोंबे, दामू दाभाडे, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण ढोमे, निवृत्ती बोंबे, सत्यवान पोखरकर, लक्ष्मण गायकवाड यांचेसह बाबाजी दाभाडे, बन्सी पोखरकर, सयाजी गावशेते, काळूराम गावशेते, रमेश वरे, बाबाजी बराटे, सचिन बोंबे, शरद दाभाडे, दत्ता वरे आदींनी प्रयत्न केले.