अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील महत्वाचे गाव असून या ठिकाणी अनेक मोठमोठे महाविद्यालय, बँका, शाळा, कंपन्या असल्याने नागरिकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच पुणे नगर रस्ता हा महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने जात असतात, सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचले जात असल्याने वाहन चालकांना खड्डा दिसत नसल्याने वाहने खड्ड्यांमध्ये आदळली जात आहे. कित्येक वेळा वाहने या खड्ड्यांमध्ये आदळून पाठीमागून येणारे वाहन या वाहनावर आदळली जात असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शाळकरी मुले व मुलींना देखील या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. परंतु यांनतर या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही.
पुणे नगर रस्ता हा महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावरुन दररोज अनेक मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी जात असतात परंतु या खड्ड्याबाबत बोलण्यास कोणीही तयार नाही त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे कि नाही? लोकप्रतिनिधींना हे खड्डे दिसतात कि नाही? लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांना पडला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन हे खड्डे दुरुस्त करावेत अशी मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहे.
सदर खड्डे बुजवण्याची व्यवस्था करु: सलीम तडवी
शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्गावरील खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सलीम तडवी यांचेशी संपर्क साधला असता त्या रस्त्याचे ठेकेदाराला खड्डे दुरस्त करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर उपाययोजना करुन हे खड्डे बुजविले जातील असे सलीम तडवी यांनी सांगितले.