शिक्रापुरात मुरुम उत्खनन करणारा जेसीबी व डंपर जप्त

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुरच्या महसूल विभागाची शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई करत पोलिसांच्या मदतीने जेसीबी व डंपर जप्त केल्याची घटना घडली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड लगत जुन्या टोलनाका शेजारी एका जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काही इसम बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर मंडलाधिकारी राजेंद्र आळणे, तलाठी सुशीला गायकवाड, ज्ञानेश्वर भराटे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तान्हाजी रामचंद्र सांडभोर यांच्या जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने तब्बल दीडशे ते दोनशे ब्रास मुरुम जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केल्याचे दिसून आले.

दरम्यान महसूल विभागाने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार शंकर साळुंके, किशोर शिवणकर, स्वप्नील गांडेकर यांच्या मदतीने कारवाई करत सदर ठिकाणचा एम एच १४ एच के २२५८ हा जेसीबी व एम एच १४ ई एम ००१८ हा डंपर जप्त करत कारवाई केली आहे. तर याबाबत बोलताना सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुरुमासह पंचनामा करुन अहवाल वरिष्टांना सादर केला असल्याचे तलाठी सुशीला गायकवाड यांनी सांगितले.