नवरात्रीनिमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार नवदुर्गांकडे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात असताना प्रत्येक स्तरातील महिला नवरात्रोत्सावाचा आनंद घेत असतात. मात्र पोलिसांना नेहमीच आपल्या कर्तव्यावर हजर रहावे लागते. मात्र असे असताना देखील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनचा सर्व कारभार नवरात्रीचे 9 दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला असल्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नवदुर्गांना देखील नवरात्रीचा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे नवरात्र उत्सवातील नऊ दिवस पोलीस स्टेशन सांभाळण्याचा मान महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक यांसह महिला पोलीस शिपाई यांना देण्यात आलेला असून पोलीस स्टेशन ऑफिसर म्हणून देखील महिला पोलीस उपनिरीक्षक यांना नेमण्यात आलेले आहे, तर पोलीस स्टेशनचे मुख्य ऑफिसर म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांना नेमण्यात आले तर पोलीस ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस नाईक अपेक्षा टावरे, राणी भागवत, किरण निकम यांनी अद्याप पर्यंत 3 दिवस पोलीस ठाणे अंमलदार म्हणून काम पाहिले आहे.

पोलीस हवालदार उज्वला गायकवाड, पोलीस नाईक ज्योती आहेरकर, रुपाली हजारे, गिता बराटे, उर्मिला पवार, शीतल गवळी या महिला पोलीस देखील दररोज ठाणे अंमलदर मदतनीस, बिनतारी संदेश यांसह आदी प्रकारची कामे पार पाडत असून प्रत्येक महिला पोलीस यांना नवरात्रोत्सव निमित्ताने पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळण्याची संधी मिळणार असून आम्ही कोणत्याही कामामध्ये मागे नसून पुरुषांच्या बरोबरीने सर्वच कामे करु शकतो हे या दुर्गांनी दाखवून दिले आहे. तर याबाबत बोलताना पोलीस स्टेशन मधील आम्हाला नेमून दिलेले सर्वच काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असतो.

परंतु सध्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनचा कारभार आमच्याकडे देण्यात आलेला असल्यामुळे आम्हाला वेगळाच आनंद मिळाला असल्याचे यावेळी आजच्या ठाणे अंमलदार किरण निकम, राणी भागवत, रुपाली हजारे व गिता बराटे यांनी सांगितले, तर दिवस भरात आलेल्या सर्व तक्रारी, संदेश, यांसह पोलीस स्टेशनचे कोणते कर्मचारी कोणत्या कामासाठी कोठे रवाना झाले यांसह सर्व बाबींच्या नोंदी देखील चोखपणे नोंदवून ठेवल्या आहेत, तर आलेल्या सर्व नागरिकांसोबत चर्चा करुन यांच्या तक्रारी जाणून घेण्याचे काम यावेळी या कारभार सांभाळणाऱ्या दुर्गांनी केले तर आलेल्या अनेक महिलांनी मोकळ्या मनाने चर्चा केली असल्याचे देखील या सर्व दुर्गांनी सांगितले.