युवा पिढीने थोर व्यक्तींचा आदर्श ठेवावा; डॉ. मिलिंद कसबे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांसारख्या थोर व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला दरम्यान युवकांचे सामाजिक भान याविषयावर प्रा. डॉ .मिलिंद कसबे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, डॉ. संदीप सांगळे, प्रा. किशोर आढाव, प्रा. कल्याणी ढमढेरे, प्रा. मिनाक्षी दिघे, नामदेव भोईटे यांसह आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अलिकडच्या काळात जयघोषाच्या पलिकडे आपण महापुरुषांना समजूनच घेत नाही, ग्रंथालयात जाऊन महापुरुषांविषयी साहित्याचे वाचन बारकाईने व गांभीर्याने केल्यास आपल्याला आपले आदर्श सापडतात. आपला आदर्श हेच आपले शक्तिस्थान असून त्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा आणि उर्जा मिळते तेच आपल्याला यशस्वी होण्यासाठी झपाटून टाकतात.

दरम्यान आपला आदर्श चुकला तर आपल्या आयुष्याची दिशा चुकते आणि आपण भरकटतो त्यामुळे आपण आपल्या आदर्शाची निवड डोळसपणे करायला हवी. तर युवकांनी दुसऱ्याच्या सावलीत उभे राहण्यापेक्षा स्वतःची सावली निर्माण करायला हवी. तरुणवर्गाने जीवनात विधायक ध्येय ठेवून ती ध्येय साकार करण्यासाठी त्या ध्येयाचा ध्यास आणि पडेल ते कष्ट करण्याची कायम तयारी ठेवली पाहिजे, असे देखील प्रा .डॉ. कसबे यांनी यावेळी सांगितले .

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन प्रा.अविनाश नवले यांनी केले तर प्रा. दत्तात्रय कारंडे यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. केशव उबाळे यांनी आभार मानले.