उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाची हत्या

क्राईम

कन्नड: पेडकवाडी घाटातील पुलाच्या पाईपमध्ये सागर जैस्वाल या तरुणाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीसांनी अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे- राहणार धनगरवाडी, औराळा व दिनेश शांताराम साळुंखे रा. कविटखेडा तालुका कन्नड यांनी सागर संतोष जैस्वाल याच्याकडून उसनवार पैसे घेतलेले होते. सागरने चारचौघात पंढरीनाथ आणि दिनेशला पैशांची मागणी केल्यामुळे दोघेही अपमानित होऊन दोघांनी सागरला (दि. २०) नोव्हेंबर रोजी तुझे पैसे पेडकवाडी येथे येऊन घेऊन जा म्हणत बोलावले व तेथे सागर याच्याशी वाद घालत लोखंडी हातोडी व दगड डोक्यात मारुन त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह साडी व प्लास्टीकमध्ये गुंडाळून पेडकवाडी घाटातील म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाखालील पाईपमध्ये लपवून ठेवला.

2१ नोव्हेंबर रोजी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात सागर जैस्वाल बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दिल्यावर तपास सुरु असताना (दि. १) डिसेंबर रोजी पेडकवाडीचे पोलीस पाटील आसाराम कलाल यांनी घाटातील पाईपमध्ये मृतदेह असल्याचे ग्रामीण पोलीसांना कळविले.

सदरील मृतदेह सागर जैस्वाल चा असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु करत अवघ्या ४८ तासांत खुनाचा उलगडा मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. सागरला मारल्यानंतर आरोपींनी सागरच्या अंगावरील सोन्याची साखळी, हातातील अंगठ्या, कानातील बाळी सुद्धा काढून घेतली होती.