हुश्य! शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी गजाआड करण्यात यश

क्राईम

शिरूर: शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. शिरूर हद्दीत मधील काही काळात मोठ्या प्रमाणात चोऱया झाल्यामुळे शिरूर पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण, एका चोरीप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या हद्दीमध्ये व शिरूर शहरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले होते. शिरूर शहरातील सुरेखा सुनिल सातव (रा. जिजामाता गार्डन जवळ, शिवाजी हौसींग सोसायटी) यांचे राहते घराचे बंद दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरटयाने तोडून आतमध्ये प्रवेश करून घरामधील बेडरूमचे कपाटातील व दिवानमधील एकूण ५५,००० रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून चोरून नेला होता.

या तपासात घरफोडीतील आरोपी दादया उर्फे अनिल विठ्ठल वेताळ (रा. शिरूर) याला गजाआड करण्यात शिरूर पोलिस स्टेशनला यश आले आहे. इतर ठिकाणच्या चोऱ्यातील आरोपी गजाआड करण्याची मागणी परीसरातील नागरीक करत आहेत. शिरूर पोलिस स्टेशनचा बराचसा स्टाफ पंढरीच्या वारीसाठी बंदोबस्त कामी गेला आहे. तसेच शिरूर पोलिस स्टेशनची हद्द मोठी असून, अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे तपासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे.