Money

शिरुर तालुक्याच्या पूर्वभागातील अजून एका सावकारावर गुन्हा दाखल

क्राईम

शिरुर (तेजस फडके): पतीला अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याने नाईलाजाने पतीच्या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. त्या बदल्यात बँकेचे तीन चेक तसेच काही जमीन संबंधित सावकाराच्या नावाने खरेदीखत करुन दिली. मुद्दल आणि व्याजही परत दिले असताना अधिक व्याजाची मागणी करत खरेदीखत केलेली जमीन परत द्यायला नकार दिला. शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने मांडवगण फराटा येथील भानुदास धोंडीराम फराटे या खाजगी सावकारावर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील फिर्यादी महिलेच्या पतीला सन 2017 साली हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी गावातील सावकार भानुदास फराटे यांच्याकडून सदर महिला व तिच्या मुलांनी 24 नोव्हेंबर 2017 रोजी 7 लाख रुपये प्रतिमाह 4 रुपये टक्याने घेतले होते. रक्कमेकरीता सिक्युरिटी म्हणून भानुदास यानी फिर्यादी महिलेचा मुलगा याच्याकडून मांडवगण फराटा येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेचा सही केलेला 1 चेक त्यावर 5 लाख एवढी रक्कम नमुद केली होती. फिर्यादी महिलेचा दुसरा मुलगा याच्या नावावर मांडवगण फराटा येथील जिजामाता सहकारी बँकेच्या शाखेचे दोन सही केलेले कोरे चेक आणि 100 रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर सिक्युरीटी पोटी लिहून घेतले.

unique international school
unique international school

फिर्यादी महिलेकडून मांडवगण फराटा येथील त्यांच्या मालकीची 11 गुंठे शेतजमीन खरेदीखत करुन लिहून घेतली. त्यांनतर सदर खरेदीखत पैसे परत दिल्यानंतर रद्द करुन देण्याचे मान्य केले. व्याजाने घेतलेली मुद्दल 7 लाख रुपये हि रक्कम फिर्यादी महिला आणि तिच्या दोन मुलांनी रोख स्वरुपात वेळोवेळी भानुदास यास दिले आहेत. सन डिसेंबर 2017 पासून ते आजतागायत 04 टक्के प्रतिमाह प्रमाणे 14 लाख रुपये व्याजापोटी दिले आहेत. असे असतानाही भानुदास याने सदर कुटुंबाकडे अधिक पैशांची मागणी करत 12 लाख रुपये मागितले. आणि ते न दिल्यास खरेदीखत रद्द पुन्हा रद्द करुन देणार नाही असे म्हणत फोनवर शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी महिलेने 6 जुलै रोजी शिरूर पोलिस स्टेशन येथे भानुदास फराटे यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला होता. त्याच अनुषंगाने शिरुरचे पोलिस निरिक्षक सुरेशकुमार राऊत यांनी या अर्जाची चौकशी करुन शिरुर येथील सहायक निबंधक सहकारी संस्था यांना लेखी पत्राव्दारे कळविले. 12 जुलै रोजी सहायक निबधक आणि त्यांच्या पथकाने पोलिस स्टाफ आणि पंच यांच्या समक्ष भानुदास धोंडीराम फराटे यांच्या घरी जावून त्यांच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी स्टॅम्प, चेक, रजिस्टर आदी दस्तऐवज यांचा पंचनामा करत पुढील तपासासाठी सदर कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात दिली. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करत आहेत.