sangita-shinde-shirur

हृदयद्रावक! शिरूर बायपासवर लुटारूंच्या तावडीतून वाचला जीव अन् पुढे नियतीचा क्रूर खेळ…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर बाह्यवळणावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. लुटारूंच्या तावडीतून जीव वाचवून बाहेर पडलेल्या महिलेचा काही मिनिटांतच भीषण अपघातात मृत्यू झाल्याने नियतीच्या क्रूर खेळाची प्रचिती आली. मदतीसाठी धावून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकालाही या अपघातात गंभीर दुखापत झाली असून, टेम्पोचालकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव संगीता परमेश्वर शिंदे (वय ४९, रा. ढवळगाव, जि. अहिल्यानगर) असे आहे. तर त्यांना मदत करणारे सोमनाथ खेडकर (वय ६५) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी दादा धोंडीबा सावंत यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे या भंगार गोळा करण्याचे काम करत होत्या. शनिवारी कारेगाव येथून ट्रकमधून त्या ढवळगावकडे परतत असताना ट्रकचालक व त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवत त्यांचे दागिने लुटले. त्यानंतर त्यांना शिरूर बायपासवर रस्त्यावर ढकलून देत आरोपी पसार झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

जीवाच्या भीतीने हादरलेल्या संगीता शिंदे यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. काही वेळाने तेथून जाणारे परिचित सोमनाथ खेडकर यांनी त्यांना दुचाकीवरून घरी सोडण्याची तयारी दर्शविली. दोघेही दुचाकीवरून ढवळगावच्या दिशेने निघाले. मात्र काही अंतर जाताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, संगीता शिंदे रस्त्यावर कोसळल्या आणि टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोमनाथ खेडकर रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला.

अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, शिरूर पोलिसांनी तातडीने तपास करून शंकर गुणाजी भोकरे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार खेडकर करीत आहेत.

दरम्यान, लुटारूंच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून बाहेर पडलेल्या संगीता शिंदे यांना घरी पोहोचण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्तीसोबत निघाल्यानंतर काही मिनिटांतच काळाने त्यांना गाठले. या दुर्दैवी घटनेमुळे शिरूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बायपासवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलेचे दागिने लुटणाऱ्या ट्रकचा शोध सुरू असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर बायपास रोडवर अंदाजे ६० वर्ष वयाचा सापडलेल्या अनोळखी पुरुषाचा झाला मृत्यु…

शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात

शिरूरमध्ये मित्राचाच मित्रावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा केला खुण

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत