शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच

क्राईम शिरूर तालुका

मलठणच्या शिंदेवाडीतून शेळ्यांची चोरी

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असुन या चोऱ्या रोखण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या मलठण (ता.शिरूर) येथील शिंदेवाडी येथून शुक्रवारी (दि.१९) रोजी रात्री बापू शिंदे यांच्या तीन शेळ्या चोरीस गेल्या आहेत. शिरुर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढविणे गरजेचे असुन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल फक्त नावापुरतेच असल्याचे दिसत आहे.

अष्टविनायक महामार्गाच्या शेजारीच बापू शिंदे यांची वस्ती असुन त्यांचे बंधू दत्ता शिंदे हे बाहेरच झोपलेले होते. चोरट्यानी दोरी कापत असताना शेळ्यांनी आवाज केल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बोलेरो जीप उभी होती. शिंदे यांना जाग आल्याचे पाहताच चोरट्यानी गाडी सुरु केली आणि धावत्या गाडीत एक व्यक्ती पळत जावून बसल्याचे दत्ता शिंदे यांनी पाहिले. त्यांच्याकडे लहानमोठ्या एकूण वीस शेळ्या आहेत. त्यातील तीन शेळ्या गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना जाग आल्यामुळे सुदैवाने बाकीच्या शेळ्या वाचल्या.

शिंदेवाडी येथे येण्यापूर्वी मुंजाळवाडी येथील एका बंदिस्त गोठ्याचा दरवाजा उघडल्याने मोकळ्या शेळ्या बाहेर आल्या. तिथेही बाहेर झोपलेल्या माणसांना जाग आल्याने तेथून चोरांनी पोबारा केला. शनिवारी शिरुर आणि चाकण येथील बाजार असतो. त्यामुळे या दोन्हीही ठिकाणी जावून बाजारात शेळ्या मिळतील या भोळ्या आशेने शिंदे कुटुंबांनी तिथे जावून शोध घेतला. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली.

शिंदेवाडी येथे चोरी झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच वर्षभरापूर्वी घरफोडीही झाली होती. त्यामध्ये साधारणपणे दहा लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला होता. त्याही घटनेचा अद्याप पोलिसांना तपास लागलेला नाही. तसेच अनेक दिवसांपासून या भागातील पोलिसांची रात्रीची गस्त बंद झाली आहे. चोऱ्या रोखण्यासाठी पोलीसांनी कडक भूमिका घ्यावी अशी मागणी शिंदेवाडी येथील सामजिक कार्यकर्ते हर्षद शिंदे यांनी केली आहे.

पोलिस सायलेंट मोडवर गुन्हेगार ऍक्शन मोडवर…

शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शिरुर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारल्यापासुन पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकलं करण्यास शिरुर पोलिस असमर्थ ठरले आहेत. शिरुरच्या पुर्व भागातील तांदळी ते बेट भागातील काठापुर खुर्द पर्यंत शिरुर पोलिस स्टेशनची हद्द असुन गेल्या काही दिवसांपासुन बेट भागात तर एका पाठोपाठ एक चोऱ्यांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांना धाकच नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन शिरुर तालुक्यातील अनेक गावात असलेले ग्रामसूरक्षा दल ऍक्टिव्ह करण्याची गरज निर्माण झाली आहे.