शिरुर पोलिस स्टेशनला ‘सिंघम’ अधिकाऱ्याची गरज; नागरिकांमध्ये चर्चा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन ते तीन वर्षात मोठया प्रमाणात खून, दरोडे, मोटार सायकल चोरी, विद्युत मोटारीची चोरी, अवैध दारुविक्री, गुटखा, मटका, गोमास विक्री, लॉजिंग, वेश्या व्यवसाय चालु असुन शिरुर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि अवैध व्यावसायिक यांच्यात “अर्थपुर्ण” संबंध असल्यामुळे कारवाईच्या आधीच संबधित अवैध धंद्यावाल्याना टीप मिळत असल्याने अवैध धंधे करणाऱ्यांचा बचाव होत असल्याने गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी शिरुर पोलिस स्टेशनला “सिंघम” अधिकाऱ्याची गरज असल्याची नागरिकांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

यापुर्वी शिरुर पोलिस स्टेशनला शंकर केंगार, शहाजी जाधव, नारायण सारंगकर, दयानंद गावडे या पोलिस अधिकाऱ्यांनी शिरुर पोलिस स्टेशन अंतर्गत गावात दबंग कामगिरी करत गुन्हेगारीवर वचक ठेवला होता. या अधिकाऱ्यांच्या काळात तालुक्यातील गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आली होती. या अधिकाऱ्यांनी अनेक अट्टल गुन्हेगारांना तालुक्यातुन “तडीपार” केले होते. परंतु त्यानंतर शिरुर तालुक्यात असे “दबंग” अधिकारी आले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षात शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली असुन शिरुर पोलिस स्टेशनला “सिंघम” अधिकाऱ्यांची गरज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

दोन वर्षात अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

शिरुर पोलिस स्टेशनची हद्द पूर्वेकडुन तांदळी ते बेट भागातील काठापुर खुर्द या गावापर्यंत शिरुर पोलिस स्टेशनची हद्द असुन पूर्वेकडे मांडवगण फराटा, न्हावरे तर बेट भागात टाकळी हाजी येथे औट पोस्ट आहेत. परंतु गेल्या दोन वर्षात शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत काही अपवाद वगळता अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तसेच गावठी दारु, गांजाची खुलेआम विक्री, किराणा मालाच्या दुकानात सर्रास विक्री होणारा गुटका असे अनेक अवैध धंदे पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोणाच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर सुरु आहेत हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. अवैध धंद्यावाल्यांशी पोलिसांचे असलेले “अर्थपुर्ण” संबंध हा तर शिरुर शहरातील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनला आता “सिंघम” अधिकाऱ्याची गरज असल्याचे सर्वसामान्य लोक मत व्यक्त करत आहेत.