शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, पाच गुन्ह्यांचा उलगडा
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा शिरूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अखेर छडा लावत परजिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी अटकेत असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या टोळीने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल पाच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
(दि. २६) जानेवारी २०२५ रोजी रात्री ९:३० वाजता जोशीवाडी, शिरूर येथे फिर्यादी महिला हनुमान मंदिराजवळून जुन्या हायवेवरील गणेश डेअरीसमोरून पायी जात असताना स्कुटीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे २७,८४० रुपये किमतीचे ७.९३० ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केली. या घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ६७/२०२५ भादंवि कलम ३०४(२) अन्वये दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शोध पथकाला तपासासाठी आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस अंमलदार नितेश थोरात आणि विजय शिंदे यांनी संशयित आरोपींचा माग काढत त्यांचा अहिल्यानगर येथील ठावठिकाणा शोधून काढला.
पोलीस पथकाने अहिल्यानगर येथे जाऊन दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे १) गणेश सुनील गायकवाड (वय २१) रा. सारसनगर, शांतीनगर, सोलापूर रोड, अहिल्यानगर २) करण नरसी वाघेला (वय २४) रा. संजयनगर, काटवन खंडोबा, स्टेशन रोड, अहिल्यानगर अशी असून या दोघांची चौकशी केली असता, त्यांनी तिसऱ्या साथीदार साजीद सलीम शेख (रा. अहिल्यानगर) याच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली. साजीद हा सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
या टोळीने खालील गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे:
१) गु.र.नं. ६७/२०२५ – भादंवि कलम ३०४(२), ३(५)
२) गु.र.नं. २१४/२०२५ – भादंवि कलम ३०४(२)
३) गु.र.नं. ८२५/२०२४ – भादंवि कलम ३०३(२), ३(५)
४) गु.र.नं. ५७४/२०२४ – भादंवि कलम ३९२, ३४
५) गु.र.नं. ९५३/२०२४ – भादंवि कलम ३०४(२)
तपासादरम्यान चोरीस गेलेले दागिने आरोपी साजीद शेख याने त्याचे वडील आजारी असल्याचे कारण देत एका स्थानिक सोनाराकडे ठेवले होते. त्या सोनाराने दागिने पोलीसांना सुपूर्त केल्याने ते जप्त करण्यात आले आहेत.
या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक सुमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.ही धडाकेबाज कारवाई पो.स.ई. शुभम चव्हाण, पो.ह. नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, रविंद्र आव्हाड, निखील रावडे, अजय पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.