रांजणगाव MIDC त बोगस माथाडीच्या पावत्या फाडल्याप्रकरणी माजी सरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

झामिल स्टील कंपनीचा व्यवस्थापक राहुल भागवत आणि ढोकसांगवीचा माजी सरपंच मल्हारी मलगुंडे यांनी केली फसवणूक

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीत बाहेरुन माल घेऊन येणाऱ्या माल वाहतुक गाडयांना कंपनीच्या बाहेर अडवून त्यांच्याकडुन पुणे माथाडी, हमाल व श्रमजीवी कामगार मंडळाच्या नावाने बोगस पावत्या देऊन बेकायदेशीर पैसे उकळून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी झामिल स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापक राहुल भागवत आणि ढोकसांगवी गावचा माजी सरपंच मल्हारी मलगुंडे या दोघांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले असुन याबाबत पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश विठ्ठल मते (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून रांजणगाव MIDC मधील झामिल स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटच्या बाहेर बेकायदेशीररीत्या माथाडीच्या नावाखाली राहुल भागवत आणि मल्हारी मलगुंडे हे दोघेही वाहनचालकांना संगंनमताने पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ तसेच जय मल्हार इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस या नावाने बनावट व बोगस पावत्या देऊन पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आल्याने पुणे माथाडी बोर्डाचे निरीक्षक राजेश मते यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यानुसार राहुल भागवत आणि मल्हारी मलगुंडे यांच्यावर शासनाच्या दस्तऐवजाचा गैरवापर करुन पैसे उकळून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे पुढील तपास करत आहेत.

आम्ही सुमारे एक ते दिड वर्षांपासुन रांजणगाव MIDC तील झामील कंपनीमध्ये बोगस माथाडीच्या पावत्या फाडल्या जातात. याबाबत मुंबई मंत्रालय, पुणे माथाडी मंडळ, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक,अप्पर कामगार आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त, लाचलुचपत विभाग, उपविभागीय अधिकारी शिरुर, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन याठिकाणी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला. तसेच पुणे येथील माथाडी बोर्ड येथे अनेकवेळा आंदोलनही होते. अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे आणि अप्पर कामगार आयुक्त पोळ यांचे या बोगस पावत्या प्रकरणी आम्हाला विशेष सहकार्य मिळाले. त्यामुळेच मुख्य सूत्रधार असलेल्या दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले आहेत.

अ‍ॅड आम्रपाली धिवार

संस्थापक, अध्यक्ष भीम बटालियन

रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या देऊन वाहनचालकांकडुन बेकायदेशीररीत्या पैसे उकळून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु हे छोटे मासे आहेत. याप्रकरणातील बडा मासा अजुनही मोकाटच असुन माथाडीच्या नावाखाली अनेक कंपन्यामध्ये बोगस पावत्या देऊन पैसे उकळून शासनाची आर्थिक फसवणूक करत आहे. त्यामुळे त्या बड्या माशाच्या विरोधात पुणे माथाडी बोर्डाकडे सर्व पुरावे देऊन त्याच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत.

बापुसाहेब शिंदे

शिवसेना युवा जिल्हाप्रमुख (शिंदेगट)

“शिरुर तालुका डॉट कॉम” ने सातत्याने उठवला आवाज 

रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडल्या जात असल्यामुळे वाहनचालकांना विनाकारण मनस्ताप होत होता. याबाबत काही वाहनचालकांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या प्रतिनिधीकडे तक्रारी केल्यानंतर याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने या विषयावर निर्भीडपणे आवाज उठवला. गेले वर्षभर सातत्याने याबाबत पाठपुरावा करुन लिखाण केले. त्यामुळे भिम बटालियनच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड आम्रपाली धिवार यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” चे आभार मानले आहेत.