शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. यामुळे पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
पिंपरखेड गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आपल्या गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केली आहे. हा पट्टा लोखंडी किंवा जाड रबराच्या पट्टीसारखा असून त्यावर छोट्या-छोट्या टोकदार खिळ्यांचा थर बसवण्यात आला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर झडप घालून हल्ला करतो, त्यामुळे जर गळ्यात असा पट्टा असेल तर तो हल्ला निष्फळ ठरू शकतो, असा महिलांचा समज आहे. ही कल्पना त्यांनी गावातील काही युवकांसोबत चर्चेतून प्रत्यक्षात आणली असून, सध्या गावातील अनेक महिला हा ‘खिळ्यांचा पट्टा’ वापरू लागल्या आहेत.
शेती हेचं उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यावर पर्याय म्हणून जसं कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, तसे पट्टे घालण्याचा निर्णय या बळीराजाने घेतला आहे. आम्ही रोज शेतात कामाला जातो, बिबट्याची भीती सतत वाटते. मग विचार केला की काहीतरी उपाय करायला हवा. प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही, त्यामुळे आम्हीच हा पट्टा तयार केला, असे पिंपरखेडच्या महिलेनं सांगितले. आमच्यासमोर बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्यावेळी जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचा संघर्ष आम्ही पाहिला होता बिबट्याने कुत्र्याची मान पकडण्याचा प्रयत्न केला पण खिळ्यांमुळे आमचा कुत्रा वाचला. आम्ही गवत खुरपताना कधी बिबट्या मागून हल्ला करेल सांगता येत नाही, म्हणून आम्ही गळ्याला पट्टा बांधला आहे, असेही महिलेने सांगितले. महिलांचा हा ‘खिळ्यांचा पट्टा’ सध्या चर्चेचा विषय ठरला असून, संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शेतात काम करतानाही सुरक्षित राहण्यासाठी महिलांनी घेतलेला हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठरत आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे. रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आले. हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि ठस्यांवरून स्पष्ट झाले आहे.
शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…
शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…
बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…
वाघाळे गावात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराहट, पिंजरा लावण्याची मागणी