Shekhar Pachundkar

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…

मुख्य बातम्या राजकीय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेली राजंणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवत भाजप नेते शेखर पाचुंदकर पाटील यांनी एका स्थानिक नेत्याविरोधात केलेले गंभीर आरोप आणि परखड भाष्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या या विस्तृत पत्रात स्थानिक विकासकामे, मतदारांवर टाकला जाणारा कथित दबाव, निवडणुकांतील राजकीय रणनीती, तसेच महिलांवर होणाऱ्या टीका-आरोपांच्या मुद्द्यांचा परखड पद्धतीने उल्लेख करण्यात आला आहे.

शेखर पाचुंदकर यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये अतिशय टोचदार शैलीत कथितपणे काही राजकीय नेत्यांचे ‘रेटून खोटं बोलणं’, गावांतील धार्मिक दैवतांच्या नावाने घेतल्या जाणाऱ्या शपथा, दबावाच्या राजकारणाचे आरोप व कार्यक्रमांमध्ये दाखवली जाणारी ‘उधारीवरील गर्दी’ अशा अनेक मुद्यांचा उल्लेख केला आहे. पत्रात त्यांनी पद्मावतीसारख्या छोट्या वस्तीत झालेल्या कार्यक्रमातील गर्दीवर टिप्पणी करत, त्या गर्दीमुळे ‘काहींची झोप उडाली असेल’ असा टोलाही लगावला आहे. तसेच चासकमानचे पाणी, वीज, ऊसतोडणी, रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधांच्या संदर्भात लोकांना अडवणे, दबाव टाकणे आणि निवडणुकीपुर्वीच दाखवला जाणारा काळजीवाहू चेहरा या मुद्द्यांवर त्यांनी थेट हल्ला चढवला आहे.

शेखर पाचुंदकर म्हणतात की, ‘आजवर लोक दबून होते, पण आता नाही… तुमचा दडपशाहीचा चेहरा लोकांना कळून चुकलाय. महागणपती बाप्पाच्या दुर्वा हातात घेऊन किती जणांना फसवलं… गावोगावी दैवतांच्या शपथा घेतल्या… गायीच्या चाऱ्याही शपथ घेतली. काही तरुणांना नोकरी किंवा माथाडी पदांच्या आशा दाखवून राजकीय फायदा उचलल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून मांडला. “MIDC मध्ये काम देऊ, निवडणुकीनंतर ही जागा तुलाच” अशा आश्वासनांचा उल्लेख करत त्यांनी चांगलीच खरमरीत टीका केली आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान दिल्या जाणाऱ्या आश्वासनांनाही त्यांनी वाचा फोडली. “साहेबांना मत द्या, पुढे मला दिलं नाही तरी चालेल” अशा बोलांची आठवण करून देत ते म्हणतात की, हे आश्वासन देणारेच आज उमेदवार म्हणून उभे आहेत. पत्राचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे महिलांवर केलेल्या टीकेबाबतचा उल्लेख. शेखर पाचुंदकर यांनी इशारा देताना म्हटले आहे की, ‘एखाद्या महिलेला, विशेषत: घरातील महिलेवर आरोप करताना तुमच्यात तारतम्य दिसत नाही… मर्यादा ओलांडू नका. रावणाने मर्यादा ओलांडली तेव्हा लंका जळाली, दुर्योधन-दु:शासनाने मर्यादा ओलांडली तेव्हा महाभारत घडलं.’ तसेच या आरोपांवर आजवर मौन बाळगणाऱ्या महिलावर्गाकडून आता जोरदार उत्तर मिळेल, असा इशारा देत त्यांनी पत्राची सांगता केली.

शेखर पाचुंदकर पाटील यांचे हे पत्र जाहीर होताच रांजणगाव परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक राजकारणातील सत्तासंघर्ष, आश्वासनांची देवाणघेवाण, महिलांवर होणारे आरोप आणि धार्मिक प्रतीकांच्या वापराबाबतचे हे पत्र आगामी दिवसांत अधिक व्यापक चर्चेचे केंद्र बनण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिवाय, आगामी निवडणूक वातावरणात चांगलाच तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

महावितरणच्या माध्यमातुन विरोधकांचा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न; शेखर पाचुंदकर

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची मुलाखत…