शिरुर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्याची येरवडा कारागृहात रवानगी

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाच्या प्रयत्नांबरोबरच तलवार व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या संकेत ज्ञानदेव काळे (वय २५, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या गुन्हेगाराला शिरुर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

 

संकेत काळे याच्याविरुद्ध कोयता व तलवारीच्या साहाय्याने दहशत पसरविणे, याच शस्त्रांच्या आधारे दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे. जातिवाचक शिवीगाळ, खंडणीची मागणी व खंडणीसाठी मृत्यू किंवा इतर जबर दुखापत पोचविणे, यासारखे सहा गंभीर गुन्हे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला दाखल होते. गेल्या काही महिन्यांत त्याचा उपद्रव वाढल्याने शिरुर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस हवालदार एस. व्ही. सांगळे, नितीन सुद्रीक, महेश बनकर व रामदास बाबर, पोलिस नाईक बी. के. भवर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन भोई, पवन तायडे, नितेश थोरात, रघुनाथ हाळनोर या पथकाने गेल्या काही दिवसांपासून संकेत काळे याच्यावर पाळत ठेवून त्याला निमोणे येथून ताब्यात घेतले.

 

संकेत काळे हा सराईत व धोकादायक असल्याने पोलिस निरीक्षक जगताप यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेसाठीचा प्रस्ताव, यापूर्वीच जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्याकडे सादर केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अंतिम मंजुरीसाठी हा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर केला होता. त्यांनी संकेत काळे याच्याविरुद्धचा स्थानबद्धतेचा आदेश नुकताच पारीत केल्याने शिरुर पोलिसांनी त्याची तातडीने येरवडा कारागृहात वर्षभरासाठी रवानगी केली आहे.