शिरुर पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याच्या ‘त्या’ स्टेटसची सर्वत्र चर्चा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणात शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांसह काही कर्मचाऱ्यांच्या विविध कारनाम्यांची शिरुर शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याने नुकतेच महागडे घडयाळ खरेदी केले असुन त्याचे स्टेटस त्याने सोशल मीडियावर ठेवल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दिड वर्षात अवैध धंद्याना ऊत आला असुन गुटका, मटका, जुगार, गावठी दारु, अवैध प्रवासी वाहतुक तसेच गोमासं विक्री, सोनसाखळी चोरीचे प्रकार वारंवार घडत असुन पोलिस आणि अवैध व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे आणि पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने पोलिसांकडुन अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच शिरुर तालुक्यातील अनेक हॉटेल मध्ये शिरुर पोलिसांना बेकायदेशीर दारुचा साठा सापडत असुनही कारवाई करताना मात्र पोलिस वैयक्तिक हितसंबंधामुळे कमी दारुसाठा दाखवत असल्याचीही चर्चा आहे.

पोलिस कर्मचाऱ्याचे महागडे घड्याळ आणि वाढती गुन्हेगारी…

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका महिलेला मारुन पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. शिरुर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झालेले अनेक महिने उलटले आहेत. निमोणे येथे काही महिन्यापुर्वी पाहुणा म्हणुन आलेल्या एका वृद्धाचा खून झाला त्यानंतर काही दिवसातच एका युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. परंतु या सर्व गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. तसेच शिरुर शहरात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला असुन गेल्या वर्षभरात सुमारे दहाच्या आसपास सोनसाखळी चोरीचे प्रकार घडले असुन पोलिसांनी यावर काय कारवाई केली हा प्रश्न अजुनही गुलदस्त्यात आहे.