सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ऊसा बरोबरच कांदा पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. कारण ऊसाचे वर्षातून एकदाच पैसे येतात आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शेतकऱ्यांना सतत पैसे लागत असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढत आहे. तसेच कांद्याचे कमी कालावधीत बाजारभाव चांगला मिळाला तर कधी कधी चांगले पैसे होतात. त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन कांदा पिकातून अनेकदा शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला आहे. परंतु यावर्षी ना हवामानाने साथ दिली ना बाजारभावाने साथ दिली त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

कांदा पिकासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असुन कांदाच्या एकरी 10 टन उत्पादन गृहीत धरले. तरी आजच्या बाजारभावाप्रमाणे 4 ते 8 रुपये प्रतिकिलो बाजारभाव असुन सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसाबसा निघत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच व्यापाऱ्याला कांदा विकत दिला आहे. त्यामुळे काही शेतकरी कांदा अनुदानापासुन वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांचा केलेला खर्च हि वसुल होताना दिसत नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारणी केलेली आहे. असे शेतकरी कांदा साठवण करुन ठेवण्याच्या तयारीत आहेत.

परंतु सध्या शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असल्यामुळे काढणीस आलेला कांदा तसेच शेतात काढुन ठेवलेला कांदा भिजल्याने उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच अवकाळी पाऊसाने भिजलेला कांदा साठवण करता येणार नसल्याने शेतकऱ्यांना आहे त्या भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात बाजार भाव वाढला तर मिळणाऱ्या नफ्याला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. एकंदरीतच कांदा उत्पादक सर्वच बाजुने अडचणीत सापडला असुन यातुन त्याला बाहेर काढण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरसकट 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

शेतकऱ्यांनी कांदा काढणी करण्या अगोदर एक किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची एक फवारणी घ्यावी त्यामुळे कांदा साठवणूकीत जास्त दिवस साठवला जाईल. तसेच कांदा चांगला वाळवुन साठवावा त्यामुळे आद्रता राहणार नाही. तसेच किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची कांदा काढणी करताना फवारणी केल्यास साठवणूक केलेल्या कांद्यात बुरशीमुळे व फुलकिडेच्या प्रादुर्भावाचा परिणाम होणार नाही. कांदा जास्त दिवस टिकला जाईल तसेच कांदा चाळ निर्जंतुक करताना कार्बेन्डाझिमची फवारणी करावी तसेच गंधकाची धुरी करावी जेणेकरून बुरशी नाश पावतील व कांदा जास्त दिवस टिकेल.

जयवंत भगत

कृषी सहायक

सध्याच्या कमी बाजारभावामुळे आणि अवकाळी पाऊसामुळे काढणीस आलेला कांदा भिजून नुकसान होत आहे. खरीप हंगामात लावलेला कांदा साठवणूक करतानाही आम्हाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. कांद्याला सध्या खुपच कमी बाजारभाव असल्याने कांदा बाजारात नेण्यापेक्षा तो न काढलेलाचं बरा अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

एकनाथ वाळुंज

प्रगतीशील शेतकरी, शिंदोडी