शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): दस्तांच्या सात बारा नोंदी तुम्ही का करत नाही…? असे म्हणत प्लॉटिंगच्या सात बारा नोंदीच्या कारणावरुन महिला तलाठी सुशिला गायकवाड यांच्याशी वाद घालत जातीवाचक शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा करणाऱ्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड राकेश सोनार यांनी दिली आहे.

रमेश राघोबा थोरात असे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेल्या माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिला तलाठी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात थोरात यांच्याविरूद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी रमेश थोरात याच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिला तलाठी यांच्या मार्फत अ‍ॅड राकेश सोनार यांनी कोर्टात बाजू मांडली. ही घटना (दि २२) मे रोजी सकाळी ११ वाजता शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या इमारतीमधील सरकारी कार्यालयात घडली होती.

शिक्रापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात येऊन थोरात यांनी माझा वैयक्तिक प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. त्यातील विक्रीस गेलेल्या प्लॉटिंगबाबत मी तुमच्याकडे सात बारा नोंदीसाठी दस्त दिलेले असताना बरेच दिवस झाले तरी तुम्ही सातबारा नोंदी का करीत नाही…? असा जाब विचारत आरोपी थोरात याने वाद घालण्यास सुरुवात केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या वादा दरम्यान जातीवाचक विधान केल्यामुळे तलाठ्यांनी थोरात यांच्याविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असुन आरोपीने शिवाजीनगर न्यायालयात विशेष अ‍ॅट्रॉसिटी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.

यावेळी बचाव पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, आम्ही लोकप्रतिनिधी आहे म्हणून आम्हाला या प्रकरणात अडकवले आहे. आम्ही कोणतेही जातिवाचक विधान अणि शिवीगाळ करुन कागदपत्रे अंगावर फेकून मारली नाही. त्याला विरोध करत फिर्यादीच्या वकिलांनी जोरदार बाजू मांडली. आरोपी हे लोकप्रतिनिधी आहेत व ते जाणून बुजून बेकायदेशीर काम करण्यासाठी सदर तलाठी महिला कर्मचारी यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे. तसेच आरोपी उपसरपंच थोरात आणि त्याचे सहकारी कार्यकर्ते हे फिर्यादींना धमकी देत असतील तर आरोपीला जामीन दिला. तर उद्या फिर्यादी यांचे जगणे मुश्किल करतील हे वकिलांनी न्यायालयाला पटवून दिल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

यावेळी न्यायालयात फिर्यादी यांच्या वतीने अ‍ॅड महेश देशमुख, अ‍ॅड निलेश वाघमोडे, अ‍ॅड राकेश सोनार यांनी बाजू मांडली. तसेच अ‍ॅड राकेश सोनार यांनी आरोपी पासून फिर्यादी यांच्या जीवाला धोका असल्याचे कोर्टला सांगितले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी फिर्यादी महिलेस पोलीस संरक्षण देण्याचे आदेश तपासी अधिकारी यांना दिले असल्याचेही अ‍ॅड सोनार यांनी सांगितले.