शिरुरमध्ये घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरीला…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूरच्या वाढत्या चोऱ्यांबाबत डॉं. अमोल कोल्हेचे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र

शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून पुन्हा शिरुर शहरातील विठ्ठलनगर परिसरातून घरासमोर हँडल लॉक करुन पार्क केलेली सुमारे ७५ हजार रूपयांची बुलेट गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. भरत श्याम म्हस्के रा. विठ्ठल नगर, शिरूर यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, म्हस्के हे बुधवारी रात्री पावणेदोन वाजता बाहेरगावहून आले व घरासमोर बुलेट लावून ते झोपले. दरम्यान, सकाळी 9 वाजता उठल्यानंतर त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांना त्यांची बुलेट गाडी दिसून आली नाही. आसपास चौकशी करूनही गाडी न मिळाल्याने गाडी चोरी केल्याची खात्री झाल्याने शिरूर पोलिस स्टेशनला गाडी चोरी बाबत फिर्याद दिली आहे.

रॉयल एनफिल्ड कंपनीची त्यांची हि बुलेट (क्र. एमए २३ बीएफ १६१२) लाल रंगाची असून तीची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत करीत आहेत. शिरूर शहरात वारंवार सोनसाखळी चोऱ्या, दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या वाढत असल्याने आहेत. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील अनेक दरोडे वा चोरीच्या घटनांमध्ये साम्य आहे.

परंतु या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत असल्याचे दिसत नाही. गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा असून त्या अनुषंगाने पोलीसांची पावलं पडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, शिरूर शहर व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणाऱ्या सशस्त्र दरोडे व चोरीच्या घटना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे लेखी पत्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांना दिले आहे.